" आपलं ठेवायचं झाकून आणि.... " मनसेचा योगींना टोला

 " आपलं  ठेवायचं झाकून आणि.... "

 मनसेचा योगींना टोला 


वेब टीम मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले.   त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं होत. तर आताही ते यासाठीच आले असल्याचं सांगत राजकारण रंगू लागलं आहे. महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर आधीच टीका करण्यात आली होती.योगी आदित्यनाथ वास्तव्यास असलेल्या हॉटेलनजीक मनसेकडून बॅनरबाजी करत अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’ असं म्हणत योगी आदित्यनाथ यांचं नाव न घेता " आपलं  ठेवायचं झाकून आणि.... " स्टाईलचा  जोरदार टोला लगावला आहे .

 त्यांच्या या हॉटेलबाहेर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे

“कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….”कुठे महाराष्ट्रचं वैभव”….तर कुठे युपीचं दारिद्र्य…असे मनसेने या बॅनरमध्ये म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’,” असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

अशोक चव्हाणांची टीका 

“भाजपच्या पाच वर्षांच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आले. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही,” असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.त्याचप्रमाणे चव्हाण यांनी भाजपा सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी केल्याचा आरोपही केला आहे. “मागील पाच वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राचे आर्थिक व औद्योगिक महत्व कमी केले जात असताना भाजपचे तत्कालीन राज्य सरकार अन् नेते गप्प होते. सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला,” असा टोला चव्हाण यांनी लगावला

Post a Comment

0 Comments