नगर बुलेटीन
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी
वेब टीम नगर : केंद्र सरकारने शेतकर्यांवर लादलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करण्यात आली. तर दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, शारदा लगड, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, अशोक बाबर, सबाजीराव गायकवाड, किसनराव लोटके, उद्धव दुसुंगे, सुहास कासार, केशव बेरड, रत्नाकर ठाणगे, सिताराम काकडे, आबासाहेब सोनवणे, मनोज कोकाटे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी भाषणात भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप सरकार आडमुठी भूमिका घेऊन शेतकर्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्यास तयार नाही. शेतकर्यांचे आंदोलन दडपण्याची तयारी भाजप सरकारने चालवली आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना देखील केंद्र सरकार डोळेझाक करीत आहे. भर थंडीत आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर थंड पाण्याचा मारा केला जातोय. शेतकर्यांचे प्रश्न न सोडवता, मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी यावेळी शेतकरी विरोधी असलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करून, शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला. तर भाजप सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले असून, त्यांचे हित जपण्यासाठी अशा पध्दतीने निर्णय घेत असल्याचे सांगितले. शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव तातडीने देण्यात यावा, कृषी विषयक विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. तर मंगळवार दि.8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी नंदकिशोर भालारे
वेब टीम नगर : न्यायिक मानवाधिकार परिषदेची राज्य कार्यकारिणी पदाधिकार्यांची बैठक नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग चंद्रवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रीय कोषाध्यक्ष अंकित राज आदिंसह राज्यातील विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत न्यायिक मानवाधिकार परिषदेचा राज्यातील कार्याचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी राज्य दक्षिण विभाग अधिवेशन प्रभारी असलेले नंदकिशोर भालारे (नगर) यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी नंदकिशोर भालारे म्हणाले, न्यायिक मानवाधिकार परिषदेचे ध्येय-धोरणे जनसामान्यापर्यंत पोहचवून समाजातील भ्रष्टाचार, महिला उत्पीडन, महिलांचे शोषण, मानवाधिकार हनन सारख्या गंभीर घटनांविरोधात वचक ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. परिषदेच्या पदाधिकार्यांचे प्रयत्नाने राज्यभर संघटनेचे काम वाढत आहे. यामध्ये जास्तीत-जास्त सभासदांना सहभागी करुन घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न आपण करु, असे सांगून सर्वांचे आभार मानले.
नूतन राज्य अध्यक्ष नंदकिशोर भालारे यांच्या निवडीचे नगर जिल्ह्यातील परिषदेच्या पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शासनाच्या शिक्षण विभागाचे हिंद सेवा मंडळाला कायम सहकार्य : प्रा. शिरीष मोडक
वेब टीम नगर : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे मार्गदर्शन व सहकार्य हिंद सेवा मंडळाला कायम होत असते. या विभागाच्या कर्त्यव्यदक्ष उपसंचालिका मीना शेंडकर याही संस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी बहुमोल सहकार्य करतील. अशा चांगल्या अधिकारी असलेल्या मीना शेंडकर यांचे सारडा महाविद्यालयात स्वागत करतांना आनंद होत आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या पुणे शिक्षण विभागाच्या उपसंचालिका मीना शेंडकर व उपशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांनी भेट देवून महाविद्यालयाच्या कामकाजाची व शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी मीना शेंडकर यांचा सत्कार केला तर मंडळाचे कर्याध्यक्ष अजित बोरा यांनी ज्योती परिहार यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. अनंत फडणीस, माजी सचिव सुनील रामदासी, डॉ. पारस कोठारी, प्रा. मकरंद खेर, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ. मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक डॉ. सुजय कुमावत आदींसह प्राध्यापक उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना उपसंचालिका मीना शेंडकर म्हणाल्या, सारडा महाविद्यालयाची निसर्गरम्य वातावरणात असलेली वास्तू पाहून आनंद होत आहे. पुणे विभागात नावाजलेल्या सारडा महाविद्यालयाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देवून सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी आभार मानतांना सारडा महाविद्यालयाच्या सर्व क्षेत्रातिल प्रगतीची माहिती देवून उज्वल निकालाची मोठी परंपरा असल्याचे सांगितले. प्रारंभी डॉ. पारस कोठारी यांनी स्वागत व प्रसाताविक केले. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सुत्रसंचलन केले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकर्यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाचा पाठिंबा
शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी मंगळवारी जेलभरो आंदोलन
वेब टीम नगर : गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर शेतकर्यांनी ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत शहरात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राजेंद्र करंदीकर, डॉ. भास्कर रणनवरे, बाळासाहेब पातारे, सुभाष गायकवाड, सुरेश गायकवाड, संपत पवार, सुधाकर पातारे, मुक्ती अल्ताफ, जैद शेख, अशोक साळवे, श्याम काते, इमरान सय्यद, शिवाजी भोसले, अशोक साळवे, मनोहर वाघ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
घेण्यात आलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विविध राज्यातून आलेल्या शेतकर्यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने संपुर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पाश्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलनास सक्रीय पाठिंबा देण्यात आला असून, मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दुपारी ३ वाजता कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधात मंजूर केलेले तीन काळे कायदे त्वरीत मागे घेण्यात यावे, शेतकर्यांच्या मुलाला योग्य हमी भाव मिळावा व शेतकर्यांकडून अल्प दरात माल खरेदी करुन जास्त भावाने विक्री करणार्या दलालांवर कारवाई होण्यासाठी लोकसभेत नवीन कायदा पारीत करावा, निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाळ बोठेच्या अवैध धंद्याची , संपत्तीची सखोल चौकशी व्हावी
अजीम राजे : समाजवादी पार्टीची मागणी , पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन
वेब टीम नगर : रेखा जरे हत्याकांड मधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांचा पुणे महामार्गावर सुपा जवळील जातेगाव घाटात निर्दयीपणे खून करण्यात आला . या हत्याकांडात पत्रकार बाळ बोठे मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या तो फरार असून, त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, बाळ बोठे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आला आहे. बातमीदार ते मुख्य संपादक पदाचे काम पाहत असताना त्याने कोट्यावधी रुपयाची संपत्ती कोठून आणली? याची चौकशी होणे गरजेचे आहे. काही दिवसापुर्वी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात छापून जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना तसेच प्रशासकीय अधिकार्यांना ब्लॅकमेल केले. या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या बोठे याचाही सहभाग आहे का? याचा देखील तपास करणे महत्त्वाचे ठरणार आहे. बोठे याने मिळवलेल्या पदव्या दडपशाहीने मिळवल्या का? हा उलगडा करण्यासाठी पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी, त्याची अवैध संपत्ती जप्त करण्यात यावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उढ्ढाण पुलाला बाबासाहेबांचे नांव देण्याची मागणी
वंचित बहुजन आघाडी : जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
वेब टीम नगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी योग्य जागा निश्चित करावी, शहरात होत असलेल्या उढ्ढाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव द्यावे व टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जीवन पारधे, फिरोज पठाण, विवेक विधाते, पै. जग्गू गायकवाड, राहुल कांबळे, रवी भिंगारदिवे, अमर निर्भवणे, ऋषिकेश जाधव, आकाश जाधव, अतुल पाखरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा संदर्भात अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत शासन कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नसून, नेहमीच टाळाटाळ केली जात आहे. राजकारणा पुरते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन समाजाची दिशाभूल करण्याचे काम वेळोवेळी करण्यात आली आहे. पूर्वी सक्कर चौक येथील जागा पूर्णाकृती पुतळ्यासाठी नियोजित केली होती. सदर जागा ही महानगरपालिकेची असून पालिका प्रशासन वेळोवेळी हेतुपुरस्सर पुतळ्या संदर्भात उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सर्वपक्षीय कमिटी संघटित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित करावी, प्रस्तावित उड्डाणपुलास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण करून सामाजिक कार्यासाठी ते खुले करावे, सदर ठिकाणी सुसज्ज वाचनालय सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागण्या पुर्ण होईपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करु नेय असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
‘डीपर’तर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ९ महिने मोफत प्रशिक्षण
वेब टीम पुणे : महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची विज्ञानातील आणि गणितातील रुची वाढावी, पाया भक्कम व्हावा,विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगसारख्या विभागात सहज प्रवेश मिळावता यावा, विशेषतः राज्यातील ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना यांचा अधिक फायदा व्हावा यासाठी डीपर ही सामाजिक संस्था प्रयत्नशील आहे.
आपल्या राज्यातील (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, विज्ञान) शाखेतील शिक्षकांना डीपर मार्फत मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण राज्याला उत्कृष्ट शिक्षक देणार आहेत. त्यासाठी संस्थेने सर्व तयारी केली असून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे. अनेक शिक्षक त्याचा लाभ घेत आहेत.
आपल्या माध्यमातून जर सर्व विज्ञान शिक्षकांना,प्रमुखांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे कळवले तर शिक्षकांचा सहभाग वाढून आपल्या विद्यार्थ्यांना ते उत्तम मार्गदर्शन करू शकतील. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंतदर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा हाच मुख्य उद्देश आहे.
आज राज्यात शिक्षकांना या पध्दतीने मार्गदर्शन करणारी कोणतीही शासकीय यंत्रणा नाही, सामाजिक भावनेतून डीपर ही अराजकीय स्वयंनिर्वाही सामाजिक संस्था शिक्षकांना प्रशिक्षण देवून शासनाच्या कामात सहकार्य करु इच्छिते आहे. या विद्यार्थीहिताच्या प्रयत्नांना आपला अनुकूल प्रतिसाद अपेक्षित आहे.
हे प्रशिक्षण दि. ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे.३० ऑगस्ट २०२१पर्यंतचे वेळापत्रक तयार आहे. यापूर्वीच १ नोव्हेंबरपासून एक महिन्याचा पायलट प्रोजेक्ट केलेला आहे आणि ९०० शिक्षक आतापर्यंत सहभागी झालेले आहेत व ते रात्री ९ ते ११ या सुविधेचा लाभ घेत आहेत. गुणवत्तेच्या पातळीवर उत्तम काम सुरू आहे. याची व्याप्ती वाढून या प्रशिक्षणाचा फायदा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन डीपर चा वतीने करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments