राज्याचं चित्र बदलतंय : शरद पवार
वेब टीम मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीनं निर्विवाद बाजी मारत भाजपला धोबीपछाड दिली आहे. विशेषत: पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या रूपानं महाविकास आघाडीनं प्रथमच मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या निकालावर खूष झाले आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ वगळता जवळपास सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालानंतर शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
नागपूर पदवीधरच्या जागेवर गेली अनेक वर्षे आम्हाला कधी यश मिळालं नव्हतं. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडं अनेक वर्षे त्या जागा होत्या. तिथंही काँग्रेसच्या उमेदवाराच्या रूपानं महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. पुणे विभागाचा निकाल यापूर्वी आम्हाला अनुकूल नव्हता. मात्र यावेळी तो मोठ्या फरकानं आम्हाला अनुकूल आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचं चित्र बदलतंय. त्या बदलाला सर्वसामान्य लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे. महाविकास आघाडीनं एकत्रित काम करताना जी कामगिरी केली आहे, त्यावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे हेच यातून दिसतं,' असं शरद पवार म्हणाले. सर्व विजयी उमेदवारांचं त्यांनी अभिनंदनही केलं.
0 Comments