भाजप च्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा विजय

भाजप च्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा विजय 

वेब  टीम नगर : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे.

पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. थोड्यावेळात अधिकृत त्यांच्या विजयाची घोषणा केली जाईल. लाड हे सकाळी ९ वाजता शरद पवार यांच्या भेटीला मोदीबागेत जाणार आहेत.

नागपूरमध्येही भाजपाला धक्का

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

औरंगाबादमधूनन सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल ११६६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

Post a Comment

0 Comments