घरकुल वंचितांनी साजरा केला जिजाऊ पाडवा

 घरकुल वंचितांनी साजरा केला जिजाऊ पाडवा

पुढील दिवाळी घरकुल वंचितांच्या प्रकल्पात साजरी करण्याचा मानस

वेब टीम नगर - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचितांनी जिजाऊ पाडवा साजरा केला. जिजाऊ पाडव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याप्रमाणे सर्वसामान्य जनता व दुर्लक्षीत घटकांचे कल्याण होण्यासाठी राज्य असतित्वात येण्याची प्रार्थना करण्यात आली. तर पुढील दिवाळी पावीर हमी भूमी गुंठामुळे यशस्वी होत असलेल्या घरकुल वंचितांच्या प्रकल्पात साजरी करण्याचा मानस घरकुल वंचितांनी व्यक्त केला.

जिजाऊ पाडव्यानिमित्त खारेकर्जुनेचे कैलास लांडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले, संतोष अडागळे, सोमनाथ अडागळे, हिराबाई शेकटकर, विठ्ठल सुरम, लतिका पाडळे, फरिदा शेख, अनिता वडागळे, मिरा साळवे आदींसह घरकुल वंचित उपस्थित होते.

राज्य व केंद्र सरकार घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्यास दुर्लक्ष करीत असल्याने संघटनेने स्वत: शहरालगत जागा शोधून लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर भूमी गुंठा आवास योजना सुरु केली. इसळक-निंबळक येथे २३० घरांचा प्रकल्प उभा राहत असताना, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात एक गुंठा जमीन मिळणार आहे. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय सरकारी योजनेतून घरासाठी त्यांना ५० हजार रुपये देखील अनुदान मिळणार असल्याने घरकुल वंचितांना ही जागा अवघ्या ३० हजार रुपयातच उपलब्ध होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवाजी महाराज घडले व स्वराज्य उभे राहिले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी दिलेल्या सन्मानामुळे संपुर्ण स्त्री जातीचा आदर झाला. सध्या समाजात मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार घडत असताना शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर आधारीत राज्य असतित्वात येण्याची आवश्यकता आहे. महाराजांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शालेय स्तरापासूनच संस्कार घडण्याची गरज असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली.  

Post a Comment

0 Comments