वंचित घटकातील मुलांसह बालदिन उत्साहात साजरा

चाईल्ड लाईन,मराठी पत्रकार परिषदच्या वतीने

वंचित घटकातील मुलांसह बालदिन उत्साहात साजरा

बालकांचे हक्क व संरक्षणाचा जागर

आकाशात फुगे सोडून पंडित जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन

वेब टीम नगर - स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन व मराठी पत्रकार परिषदच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी वंचित घटकातील मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. चाईल्ड लाईन व बालभवनच्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय...., देश की ताकत हम सब बच्चे..., जोडो जोडो भारत जोडो... च्या घोषणा देत आकाशात फुगे सोडले. तर बालकांचे हक्क व संरक्षणाचा जागर करीत चाईल्ड लाईन से दोस्ती या सप्ताहाचे प्रारंभ करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोतवालीचे सहा.पो.नि. हेमंत भंगाळे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष डॉ.अमित बडवे, सुधीर लांडगे, अन्सार सय्यद, बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाठ, स्वच्छता निरीक्षक आर.पी. तावरे आदी उपस्थित होते.


प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविकात हनिफ शेख यांनी कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत व सहकार्याची गरज भासणार आहे. तर मुलगी वाचवा, बालकांच्या हक्काचे संरक्षण व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

सहा. पो.नि. हेमंत भंगाळे यांनी शालेय जीवनात अपयश आले तरी न डगमगता आपले गाठले पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी जिद्द व कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी. आजचा संघर्ष उद्याचा भविष्यकाळ उज्वल करणारा आहे. बालकांवर अत्याचार होवू नये यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष राहून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मन्सूर शेख यांनी उपस्थितांना बाल दिन व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गिरीश कुलकर्णी यांनी लहान मुले व मुली अत्याचाराला बळी पडत असून, बाल अत्याचार मुक्त जिल्हा घडविण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.

उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प वाटून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात झोपडपट्टीमधील असंघटित, आर्थिक दुर्बल घटक असलेले बालके सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी माने यांनी केले. आभार चाईल्ड लाईनचे महेश सुर्यवंशी यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा पोपळघट, शाहिद शेख, अब्दुल खान, राहुल कांबळे, राहुल वैराळ, प्रविण कदम, शुभांगी माने, आलीम पठाण आदी चाईल्ड लाईन व बालभवनच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments