जात, धर्म व पंथापलीकडे जाऊन
घर घर लंगर सेवेने कार्य केले
पो. अधिक्षक मनोज पाटील : गरजू घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोनचे वाटप
वेब टीम नगर - कोरोनाच्या संकटकाळात जात, धर्म व पंथापलीकडे जाऊन घर घर लंगर सेवेने माणुसकीचे कार्य केले. संपुर्ण मानव जातीवर संकट ओढवले असताना सर्वांनी एकत्र येऊन केलेले माणुसकीचे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, त्यांच्या शिक्षणासाठी लंगर सेवेने स्मार्ट फोन उपलब्ध करुन एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. मध्यमवर्गीय गरजू घटकातील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन उपलब्ध झाल्याने त्यांचे शिक्षण सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी मोठ्या जबाबदारीने अभ्यास करण्याचे आवाहन केले.
गरजू घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे, या भावनेने घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने गरजू विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात आले. पोलीस मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक पाटील बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, शहर पोलीस अधिक्षक विशाल ढुमे उपस्थित होते.
प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी घर घर लंगर सेवेच्या वतीने मागील साडेसात महिन्यात राबविण्यात आलेल्या जेवण वाटप व इतर सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी कोरोनाच्या संकटकाळात लंगर सेवेने दिलेल्या योगदानाबद्दल माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या कौतुकाची माहिती दिली. तर पोलीस अधिक्षक पाटील यांच्या हस्ते हरजितसिंह वधवा, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, अभय लुणिया यांना यांना अभिनंदनाचे पत्र देण्यात आले.
कोरोना महामारीच्या टाळेबंदीमुळे सर्व शाळा अद्यापि सुरुझालेल्या नसल्या, तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे कार्य सुरु आहे. अनेक गरीब विद्यार्थी यांच्याकडे स्मार्ट फोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहत आहे. सदर विद्यार्थ्यांची गरज ओळखून घर घर लंगर सेवेच्या सेवादारांनी आपल्याकडे असलेले जुने मोबाईल (स्मार्ट फोन), लॅपटॉप, संगणक देण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने २९ मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक जमा करण्यात आले. जमा झालेले स्मार्ट फोन २१ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच एक संगणक व प्रिंटर विसापूर कारागृहासाठी देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी मोबाईल उलब्ध करण्यासाठी हरीश नय्यर, जनक अहुजा, राजीव बिंद्रा, अंगद मदान, चमनलाल कुमार, धनंजय भंडारे आदी सेवादारांचे सहकार्य लाभले. यावेळी घर घर लंगर सेवेचे प्रीतीपाल सिंग धुप्पड, अनिश आहुजा, राहुल बजाज, टोनी कुकरेजा, सनी वधवा, नारायण अरोरा, सुनील थोरात, अॅड. चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. राज्यात गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करुन देण्याचा हा पहिलाच उपक्रम असून, मोबाईल घेणार्या विद्यार्थी व पालकांकडून मोबाईल फक्त शैक्षणिक कामासाठी वापरण्याचे हमी पत्र देखील भरुन घेण्यात आले असल्याची माहिती लंगर सेवेच्या वतीने देण्यात आली. उपस्थितांचे आभार पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी मानले. लंगरसेवेच्या या प्रकल्पात सहभागी होऊन अजून गरजू विद्यार्थ्यांना आपल्याकडील जुने स्मार्ट फोन द्यायचे असल्यास ९४२३१६२२७२७ या नंबरवर संर्पक साधण्याचे सांगण्यात आले आहे.
0 Comments