माहिजळगाव शिवारात सराफ व्यावसायिकाची लूट
पो.नि सुनील गायकवाड : कार अडवून साठ लाखाचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात
वेब टीम कर्जत : नगर- सोलापूर राष्ट्रीय मार्गावर महिजळगाव जवळील कवटीच्या लवणात रविवारी संध्याकाळी सराफ व्यावसायिकाला अडवून एकूण साठ लाख रुपये किमतीचे सोन्या व चांदीचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत. या प्रकरणी दोन संशयिताना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिक अतुल चंद्रकांत पंडित व त्यांचा भाऊ राहुल चंद्रकांत पंडित हे आपल्या गाडीत चापडगांव आणि महिजळगाव येथील आदित्य ज्वेलर्सचे दुकान बंद करून मिरजगाव येथे जात असताना महिजळगाव-बाभूळगाव दरम्यान कवटीचे लवणं येथे तीन दुचाक्यावरील आलेल्या पाच जणांनी सराफ व्यावसायिक यांची मारुती ब्रेझा कार (एम. एच.१६ बीवाय ४३५१) गाडीवर दगडफेक करीत गाडीच्या काचा फोडून त्यांच्या कडील पिशवी हिसकावून घेतली. त्या पिशवीत दहा लाख रुपये किंमत असलेली वीस किलो चांदीचे दागिने तसेच पन्नास लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण साठ लाखाचा ऐवज लुटून चोरट्यानी पोबारा केला. सदरची घटना रविवारी सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान घडली होती. याबाबतची फिर्याद रविवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली. असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळापासून काही अंतरावर एक मोटारसायकल (एम. एच.१६ सी जे १३०४) टाकलेली आढळून आल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात अवघ्या काही तासातच यश मिळविले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments