सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे
दोन वर्षापासूनची देय रक्कम थकित
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन
उपदान, भविष्य निर्वाह निधी तसेच खात्यात जमा असणारे रजेची रोख रक्कम मिळण्याची मागणी
वेब टीम नगर - एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागात सन २०१८ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना अद्यापि देय असणारी हक्काची उपदान, भविष्य निर्वाह निधी तसेच त्यांच्या खात्यात जमा असणारे रजेचे रोख रकमेचे पैसे देण्यात आलेले नाही. ही थकित देयके मिळण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवार दि.४ नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर, बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
वास्तविक नियमाप्रमाणे सेवानिवृत्त एसटी कामगारांना सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांचे देय असणारी रक्कम अदा करणे गरजेचे असताना अहमदनगर विभागात अद्यापि कर्मचार्यांना पैशाचे वाटप करण्यात आलेले नाही. सेवानिवृत्ती कर्मचारी संघटनेतर्फे तसेच वैयक्तिक रित्या कर्मचार्यांनी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असता अद्यापि मुंबई कार्यालयाकडून पैसे आलेले नाहीत, पैसे आल्यानंतर वाटप करू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. यामुळे अहमदनगर विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह व संभ्रम सेवानिवृत्त कर्मचार्यांमध्ये निर्माण झाला आहे. वास्तविक सरकारकडून महामंडळाकडे पैसे आलेले असताना त्या पैशांचा वापर इतरत्र केला की काय? अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात सर्वच आर्थिक समस्येला तोंड देत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन ही चालू झाली नसल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच काही निवृत्त कर्मचारींचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दोन वर्षे होऊनही या कामगारांच्या हक्काचे पैसे न मिळाल्यामुळे कर्मचार्यांना व त्यांच्या कुटुंबियांना असुरक्षिततेची व उद्रेकाची भावना निर्माण झाली असल्याने निवृत्त कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
0 Comments