शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी

 जिल्ह्यातील रस्ते तातडीने दुरुस्त करावे : भाजपाच्यावतीने 15 दिवसांचा अल्टीमेट

    वेब टीम  नगर : जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या पिकाची झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, शाम पिंपळे, मनोज कोकाटे आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली असून, शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बाजरी, कापूस, उडीद, तूर, मुग, सोयाबीन, डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी, ऊस सर्व फळबाग इत्यादी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले असून, शेतकरी सध्याच्या कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या अतिशय कठिण परिस्थितीमुळे त्रस्त असून, शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकरी बियाणे व शेतीच्या मशागतीला मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करुन बसलेला आहे. अशा प्रसंगी शेतकर्‍यांच्या हातातोेंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून घेतलेला आहे. अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

  तरी सरकारी यंत्रणांना तात्काळ शेतमालाच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश देऊन त्वरित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. तरी शेतकर्‍यांना हेक्टरी किमान 30 हजार  रुपये नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असून, ती मिळाली नाही तर शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल.

     तसेच अहमदनगर जिल्हामध्ये जिल्हांतर्गत जाणार्‍या सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अहमदनगर-सोलापूर, अहमदनगर-राहूरी-शेवगांव, नगर-पाथर्डी, नगर-श्रीगोंदा, नगर-पारनेर रोडवरील खड्यांमुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली असून, जागोजागी मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवितांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वाहनचालक जीव मुठीत धरुन या रस्त्यावरुन जीवघेणा प्रवास करत आहेत.

     15 दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त न झाल्यास तालुका-तालुक्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरु देण्यात येणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments