लॉक डाउन मध्ये तरी सामान्यांना रेशन चे धान्य मिळणार का
वेब नगर (राजेश सटाणकर यांज कडून )- प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू -२ रु प्रमाणे आणि २ किलो तांदूळ ३ रु/ किलो दराने देण्याचा निर्णय तसा लोकडाउन पूर्वीच झालेला आहे.आज या योजनेची सर्रास जाहिरात शासन करते आहे.हे धान्य रेशन दुकानात पोहोच झाले असले तरी त्याचा लाभ रेशन कार्ड धारकांना होतो का ? हा खरा सवाल आहे. हि योजना यापूर्वीचीच असून त्या वेळी पिवळ्या रेशन कार्ड धारकांना सरसकट धान्य मिळत होते.सध्या केशरी कार्ड धारकांनाही
शासनाच्या वरील योजनेतील गहू तांदूळ देण्यास सांगण्यात आले हे मात्र सध्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक नाही असे कारण देऊन केशरी रेशन कार्ड धारकांना हे धान्य नाकारले जात आहे.
वास्तविक पाहता मार्च महिन्यापासून लॉक डाउन सुरु झाल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे काम बंद आहे त्यांच्याकडे १-२ दिवस पुरेल एव्हढाच अन्नसाठा असल्याने त्यांना आणि सोबतच केशरी कार्ड धारकांना सध्या या योजनेची गरज आहे, मात्र केशरी कार्ड धारकांचे आधार लिंकिंग नाही त्यामुळे त्यांना रेशनचे धान्य मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.
केशरी रेशन कार्ड आधार लिंकिंग करण्याचे काम गेले कित्येक महिने बंद असून जो व्यक्ती पराग इमारतीत ठेका घेऊन आधार लिंकिंग चे काम करत होता तो व्यक्ती अनेक महिन्यांपासून येत नसल्याने केशरी रेशन कार्ड धारकांचे आधार लिंकिंगचे काम ठप्प आहे त्याचा फटका सध्या या रेशन धारकांना बसत आहे तरी आधार लिंकिंग करण्याची प्रक्रिया पूर्ववत सुरु ठेवावी व सरसकट २-३रु प्रति किलो धान्याचे वाटप करावे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. सध्याच्या लॉक डाउनच्या स्थितीत केशरी कार्ड धारक २-३ रु दराच्या अन्न-धान्या पासून वंचित राहणार नाहीत याची खात्री करावी तरच शासन या परिस्थितीत सामान्यांना हातभार लावत आहेत हे सिद्ध होईल अन्यथा घोषणा एक आणि परिणाम मात्र शून्य अशीच स्थिती म्हणावी लागेल.
लॉकडाउन पूर्वी हे केशरी कार्ड धारक रोजगार,कामधंद्यात व्यग्र असल्याने त्यांना त्यावेळी रेशन धान्य न मिळाले तरी त्यांचा उदरनिर्वाह ज्यादा दराने धान्य घेऊन सुरु होता. रोजंदारी सोडून आधार लिंकसाठी त्यांना ज्यादा वेळ रेशन दुकान,कार्यालयात देता येत नव्हता त्यांची हि अडचण शासनाने विचारात घ्यावी आज रोजगार नसल्याने त्यांची उपासमार होत आहे.त्यांना २-३ रु दराच्या धान्याची खरी गरज आहे,तर आधार लिंकिंग आणि या कारणाने ते धान्यापासून वंचित आहेत या कडे पुरवठा खाते,जिल्हा प्रशासन लक्ष देणार आहे कि नाही हा खरा प्रश्न सध्या उपस्ततीत झाला आहे. ज्यांचे आधार लिंक होणे बाकी आहे अश्या कार्ड धारकांना स्वस्त धान्य ,मिळणे गरजेचे आहे . आता प्रश्न उपस्थित होतो कि ज्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झाले आहे त्यांना हे धान्य मिळाले का ? कारण स्वस्त धान्य दुकान दिवसभर उघडे असावे असे पुरवठा खाते म्हणत असले तरी अनेक दुकाने बंद आहेत जी दुकाने उघडतात तीही उशिराने त्यामुळे सर्व सामान्य लोकांना घराबाहेर पडणे आजच्या लॉक डाउनच्या परिस्थिती अशक्य आहे त्याचा गैर फायदा स्वस्त धान्य दुकानदार घेत आहेत त्यामुळे आधार लिंकिंग झालेल्यांपैकी किती जणांना धान्य मिळाले नाही याकडे संबंधित खाते - शासन लक्ष देणार आहे कि नाही .
आता प्रश्न येतो तो मोफत धान्याचे ५ किलो तांदूळ सरसकट मोफत देण्याचे धोरण असताना आधार लिंकिंग केलेल्यांनाच ते मिळेल असे स्वस्त धान्य दुकानदार सांगतात त्यात हे मोफत धान्य अद्याप रेशन धान्य दुकानदारांनाच प्राप्त झालेले नाहीत म्हणजे जिथे आडातच नाही तिथे पोहऱ्यात कुठून येणार ? मोफत धान्य लवकरात लवकर सरसकट देऊन लॉक डाउन मध्ये सर्व सामान्यांना धान्य देते हे सिद्ध करावे.हे केशरी कार्ड धारकांसाठी म्हणजे आधार लिंक नसलेल्यांसाठी रु ८ प्रति किलो दराने गहू व रु १२ प्रति किलोने तांदूळ देण्यात येणार आहे. मात्र हे धान्यही दुकानदारांना अजून प्राप्त नाही. मार्च- एप्रिल महिन्यात धान्य नाही आता या धान्यासाठी मी महिना उजाडणार पण त्याचे तरी वाटप सुरळीत होणार का ? हा खरा सवाल आहे .रेशन धान्य दुकानात धान्य येते पण लोकांना मिळत नाही हि खरी तक्रार आहे. लॉक डाउन मुळे सर्वसामान्यांना धान्याची गरज आहे रेशन दुकानं बंद असतात दुकाने चालू असली तर ती लवकर बंद होतात,ऐन दुपारी दुकाने उघडणे,नियम अटींच्या नावाखाली धान्य नाकारणे अश्या अनेक तक्रारी आहेत.कार्ड धारक हा धान्य दुकानदारांचा ग्राहक आहे मात्र या ग्राहकाला जी वागणूक मिळते ती अपमान कारकच असते (अपवाद आहेत) बऱ्याचदा दुकानदार या ग्राहकांवर उपकार करतो असेच चित्र पाहायला मिळते . दुकानदारांना जणू पुरवठा खात्याचाच आशीर्वाद अशी त्यांची वागणूक असते या कडे सध्या खात्याने आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे .
रेशन अन्नधान्य पुरवठ्या संदर्भात तालुकास्तरीय संपर्क क्र- जाहीर केले आहेत मात्र या क्रमांकावरही माहिती दिली जात नाही वरिष्ठांकडे बोट दाखविले जाते ते हि बऱ्याच वेळा कामात व्यग्र असल्याचे सांगितले जाते त्यामुळे रेशन कार्ड धारकांची तक्रार संबंधितांपर्यंत पोहोचतच नाही.
जिल्ह्यात ४६,१३५ मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयातून देण्यात आली आहे हे सर्व धान्य संबंधित रेशन दुकानात पोहोच झाले आहे मात्र यातील किती धान्य रेशन कार्ड धारकांना मिळाले अन किती कार्ड धारक धान्य पासून वंचित राहिले आहेत याची आकडेवारी प्रत्येक दुकानदाराकडून पुरवठा खात्याने मिळवून ती खरी आकडेवारी जाहीर करावी.
0 Comments