कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्हा यंत्रणा होतेय सज्ज
पहिल्या बाधित रुग्णाचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव
वेब टीम नगर, दि.२८ - कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंची सेवा व पुरवठा कोठेही विस्कळीत होऊ नये, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी अनेक नागरिक जमा होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यंत्रणा आता एकजुटीने या संकटाचा सामना करीत असल्याचे चित्र आहे. सोशल डिस्टंसिंग राखून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊनही त्यासाठीची सज्जता केली जात आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात गुरुवारी रात्री महत्वाच्या यंत्रणांची बैठक घेऊन त्याप्रमाणे कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाची १४ दिवसानंतर घेण्यात आलेली स्त्राव नमुना चाचणी निगेटीव आली आहे. उद्या पुन्हा त्या रुग्णाचा स्त्राव चाचणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे. आज या रुग्णासह एकूण आठ रुग्णांची चाचणी अहवालही निगेटीव आले आहेत.
महानगरपालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
सध्या कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची सेवा व पुरवठा तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळावी, यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले तसेच लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर सोशल डिस्टंसिंग राखून ग्राहकांच्या रांगा करण्यात आल्या. याशिवाय, महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण क्षेत्रातही परदेशातून आलेल्या तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात असून त्याची माहिती आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाला दिली जात आहे.
प्रतिबंधक उपाययोजनांबरोबरच आरोग्य यंत्रणा संभाव्य वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सज्ज केली जात आहे. जिल्हा व ग्रामीण स्तरावर कोरोना रुग्णांसाठी विलगीकरणासाठी (क्वारंटाईन) किती बेडस् उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती घेतली जात असून कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली जात आहे. दुर्दैवाने कोरोना बाधितांची संख्या वाढली तर त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेची तयारी सुरु आहे. कोरोना बाधितांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणारं हॉस्पिटल त्यासाठी तयार केले जाणार आहे.
याशिवाय, जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालये आदी ठिकाणची व्यवस्था विलगीकरणासाठी वापरली जाणार आहे. व्हेंटिलेटरची उपलब्धता, जिल्ह्यातील डॉक्टरांची उपलब्धता, प्रशिक्षित नर्सेसची उपलब्धता आदी बाबींवरही यात चर्चा झाली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून नागरिकांनीही त्यांची जबाबदारी ओळखावी. या विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आणि त्याचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नये. नागरिकांच्या सोईसाठी अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा अव्याहतपणे सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी ठराविक वेळेत घराबाहेर पडून गर्दी करणे टाळावे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्या व्यक्तिंव्यतिरिक्त इतरांनी घरातच थांबावे. दिनांक ०१ मार्चनंतर परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांनी स्वताहून आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच त्यांचे कुटुंबिय अथवा नातेवाईकांनी, परिसरातील नागरिकांनी अशी माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणा अथवा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments