अन म्हणे... टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करा

अन म्हणे...  टाळ्या  वाजवून कृतज्ञता व्यक्त करा


वेब टीम नगर,दि. २७ - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर करून त्याच दिवशी  जनतेसाठी अविरत कष्ट करणाऱ्या असंख्य डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेविका, पोलीस बांधव, यांच्यासाठी सायंकाळी ५ वाजता दरवाज्यात उभे राहून टाळ्या-थाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.जनतेनं त्यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसादही दिला .मात्र जनतेसाठी अविरत कष्ट करणाऱ्या वरील घटकांवर किती बाका  प्रसंग गुदरतो हे माननीय पंतप्रधानांच्या लक्षात आले नसावे यातीलच एक घटक म्हणजे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेविका या पदावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर ३ महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोरोना या साथीच्या आजाराचे सर्वेक्षणाचे काम आरोग्य सेविकांच्या पदरी पडलं. दिवस भर सर्वेक्षण करून  घरी गेल्यावर मुलं  जवळ येत नाहीत , नवरा सासू-सासरे , कुटुंबीय साथ देत नाही .सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर बाहेरही पदरी उपेक्षाच पडते.शासकीय कर्मचारी म्हणून काम करताना कंत्राटी कामगार म्हणून शासनही आमची दखल घेत नाही . अश्या स्थितीत जगावं कि मरावं अश्या दोलायमान मनस्थितीतल्या एका परिचारिकेने समस्त आरोग्य सेविकांची व्यथा एका पत्राद्वारे "नगरटुडे"ला पाठवली ते पत्र तिच्याच शब्दात प्रसिद्ध करत आहोत.

जगावं कि मरावं हा एकच प्रश्न .....? 




अभिमान वाटला २२ मार्च रोजी सर्व भारतीयांनी आरोग्य सेवा व त्याबरोबर इतरही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टाळ्या- थाळ्या , घंटा वाजवून आभार प्रदर्शन केले.

परंतु मी आवर्जून येथे आभार प्रदर्शन असा उल्लेख केला आहे कारण, खरोखऱच हे एक महाप्रदर्शन होते .

सवाल माझा मान.पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही आरोग्य सेवेतील कर्मचारी यांचे मदतीने भारत सरकार कोरोना covid-19 हा हद्दपार करू , यांचेवर मात करू , मोठ्या साथ रोगाची साथीची साखळी तोडू व तिचा नायनाट करू. परंतु संपूर्ण भारताला जी अमानुषपणाची साथ लागली आहे याला कसे हद्दपार करायचे? यांचेवर मात कशी करायची  या अमानुषपणाची , अविचारांची साखळी कशी तोडायची ?

यासाठी कोणत्या विभागातील कर्मचारी व अधिकारी अतिरिक्त सेवेसाठी  घेणार आहात?

संपूर्ण जगावर जरी कोरोना आजाराची साथ पसरली आहे परंतु शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांवर मात्र बेघर होण्याची साथ पसरली आहे .

सवाल आहे ? सामान्य भारतीय नागरिकाला एक साधी शिंक आली तरी देखील हॉस्पिटलची वाट धरणारे तुम्ही, काही वेळा आजार बळावला तर हॉस्पिटल मध्ये ॲडमीट होणारे तुम्ही  , त्या सिस्टर्सनी  फक्त हसून पहिले तरी अर्धे आजार बरे होतात अशी टवाळी करणारे तुम्हीच, त्या सिस्टर्सची एक स्माईलच  पुरेशी आहे आपला आजार बरा  होण्यासाठी असेही म्हणणारे तुम्हीच हो हो तुम्हीच तुम्हीच .....

आणि दिवसरात्र,अतिरिक्त वेळ,वेळी-अवेळी नेहेमीच अत्यावश्यक सेवा असे म्हणून कार्य करून तुमचे दुखणे आजार,वेदना कमी करणारे आम्ही आरोग्य कर्मचारी.विसरलात सगळे अहो आम्ही तर तुमच्या सगळ्यांच्या  सुखात व दुःखात सहभागी आहोत कारण आम्ही तुमच्या जन्म व मृत्यू दोन्हीचेही साक्षीदार आहोत,परंतु तुम्ही सगळे विसरलात आम्ही देखील मनुष्य आहोत .

आज या साथीच्या आजारामध्ये आम्ही आमचे घर,मूल,आई वडील सगळे सोडून नेहमीच व नेहेमी प्रमाणे तुमच्या कोरोना झालेल्या रुग्णांसाठी व तसेच कोरोना न झालेल्या इतर समाज बांधवांसाठी अहोरात्र झटतोय .

एक तर आम्ही शासकीय,आरोग्य,कंत्राटी तसेच परिचारिका कर्मचारी त्यात परिचारिका त्यामुळे ना आम्हाला घरी मान ना समाजात.त्यात कंत्राटी असल्यामुळे  सरकारही आमची जबाबदारी घेत नाही.सोयी सुविधा नाहीत,मानधन तसेच कुठलिही विमा पॉलिसी नाही, कोणतेही भत्ते नाही , कोणत्याही रजा नाहीत , सुट्ट्या नाहीत.

आज माझी सहकारी कोरोनाचा प्रादुर्भाव कुटुंबियांना होईल म्हणून तिने एकतर तिने नोकरी सोडून द्यावी किंवा नोकरीसाठी गेलीतर तिकडेच राहा घरी येऊ नकोस असे म्हणणारे कुटुंबीय......

सांगण्यास खूप वाईट वाटते कि त्या शासकीय आरोग्य कंत्राटी परिचारिका असल्या तरीही त्यासोबत त्या एक आईही आहेत,तसेच त्या विधवाही  आहेत.

त्यांनी त्यांची हि गोष्ट मला सांगितली,मी त्यांना धीर दिला,माझे घरी येण्यास सांगितले पण त्यांचे व माझे दुःख जवळ जवळ सारखेच.......  का तर मी भाडे तत्वावर राहते म्हणून घराच्या दारातच घरमालकीण बाई बोलल्या कि कोरोना साथीमुळे येथे राहता येणार नाही.त्यानंतर आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला  पण अधिकाऱ्यांनी फोन घेतला नाही,तर काही अधिकारी बोलले कि आम्हाला कोरोनाचे रिपोर्टींग आहे,काही अधिकारी म्हणाले कि लेखी द्या त्यावर विचार करू,ठरवू,सरकारी क्वार्टर्स रिकामे आहेत.परंतु अधिकारी रिपोर्टींग मध्ये आहेत त्यांना वेळ नाही फोनवर बोलू नका,उद्या प्रत्यक्ष जाऊन भेटा,लेखी अर्ज द्या, तरीही कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय घरे देता येणार कि नाही अशी उत्तरे मिळाली.
 त्यात कलम १४४ लागू झालेला, भाडे तत्वावर दुसरीकडे कुठेतरी खोली पाहायला जायचे तर कसे जायचे संचारबंदी.शेवटी ज्या गणवेषा मुळे आज आपण बेघर झालो त्याच गणवेशाचा उपयोग करून बाहेर पडलो खोलीचा शोध घेण्यासाठी त्याच बरोबर सर्व बाकीचे सहकारीही आपापल्या परीने या सहकार्यासाठी मदत मिळते का यासाठी धडपडत होते . १०० लोकांना तरी फोन केले असतील मात्र प्रत्येक जागी निराशाच .
परंतु आम्ही जे आमचे कोणीही रक्ताचे , प्रेमाचे , आपुलकीचे नाते नसतानाही ज्या रुग्णांची मनोभावे सेवा करतो त्या आमच्यातील सकारात्मक उर्जेला दाद मिळाली व आमच्या सारखेच एक कंत्राटी सहकारी परिचारिकेच्या खोली मध्ये राहण्याची व्यवस्था झाली .

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ....

आपण अश्या परिस्थिती मध्ये खरंच आरोग्य विभागाचे महत्व या जगाला,समाजाला,भारतीयांना पटवून देऊया नाईलाजाने म्हणते जर कुटुंबीय व आपण जेथे काम करतो तेथील अधिकारी व प्रशासन आपल्याला मदत करत नसेल तर आपणही या निर्दयी कृतघ्न समाजासाठी सेवा द्यायची का ? आपण अमूल्य वेळ,अमूल्य देह,अमूल्य विचार या समाजाला अर्पण करायचा का ?

एका छोट्या पण खोट्या गोष्टीची मोठी बातमी तयार होते, तर एक मोठ्या आणि खऱ्या गोष्टीची बातमी का छापून येऊ नये म्हणूनच पुन्हा एकदा आभार प्रदर्शन करणाऱ्या माझ्या भारतीय बंधू-भगिनींसाठी तुमच्या प्रेमाबद्दल,सहकार्याबद्दल मी आभार प्रदर्शन करते.



 मेरे देशमे  मेरा आपना घर २०२० -                          मेरे देशमे , मैं बेघर २०२०

१. अत्यावश्यक सेवेत आम्ही हजर  -                       आमच्यासाठी कुठलीही अत्यवश्यक सेवा नाही .

२. आम्ही आपत्कालीन परिस्थितीत हजर -                 आमच्यावर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती यंत्रणा नाही . 
३. समाजाच्या आरोग्यासाठी आम्ही घराबाहेर -            पण आम्हालाच बेघर व्हावे लागत आहे. 

Post a Comment

0 Comments