आनंदऋषीजी हॉस्पिटलचा उल्लेख सर्वत्र अभिमानाने केला जातो




आनंदऋषीजी हॉस्पिटलचा उल्लेख सर्वत्र अभिमानाने केला जातो

 सचिन डफळ -प्रोस्टेट ग्रंथी व मुतखडा उपचार शिबीर 


     वेब टीम नगर ,१६- राष्ट्रसंत आनंदऋषीजींनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. मानवतेची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा समजून आरोग्य सेवा सातत्याने करण्यात येत आहे. ज्या गावाला जातो, त्या गावी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव आदराने घेतले जाते. त्यामुळेच आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्य देशभरात नावारुपाला आले आहे. हॉस्पिटलमध्ये होत असलेले रुग्णसेवेचे कार्य महाराष्ट्र बाहेर पोहचले आहे, हॉस्पिटलचा उल्लेख सर्वत्र अभिमानाने केला जातो. गोर-गरीबांना अत्यल्प व मोफत दरात रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. हॉस्पिटलच्या स्थापनेपासून सातत्याने प्रगती होत आहे. विविध आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून रुग्णसेवा घडत आहे, असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.

     राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व.श्रीमती सुशिलाबाई लखमीचंदजी बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सतीश व अजित बोथरा परिवार यांच्या सहकार्याने आयोजित प्रोस्टेट ग्रंथी व मुतखडा तपासणी व उपचार शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, जिल्हा संघटक विनोद काकडे, रतन गाडळकर, आयोजक सतीश बोथरा, अजित बोथरा, परेश बोथरा, सौ.प्रतिभा बोथरा, कु.कोमल बोथरा, डॉ.वसंत कटारिया, डॉ.आशिष भंडारी, तज्ञ डॉ.निरज गांधी, डॉ.सौ.सुजाता दरंदले आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सुमित वर्मा म्हणाले, नगर शहर जसे ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे, तसेच रुग्ण सेवेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. मराठीची मुहूर्तमेढ नेवासा येथे झाली. त्याप्रमाणेचे रुग्णसेवेच्या कार्याची मुहूर्तमेढ नगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये झाली आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असतांना अनेक मित्र व नातेवाईकांना आरोग्य संदर्भात समस्या निर्माण झाल्यास विश्‍वासाने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येते. आई जशी मुलाला प्रेमाने सांभाळते तसेच आनंदऋषीजी हॉस्पिटल येथील स्टाफ रुग्णांना सांभाळतो.

     आयोजक अजित बोथरा म्हणाले की, आरोग्य सेवेची संधी आनंदऋषीजी हॉस्पिटलने उपलब्ध करुन दिली आहे. येथे हजारो रुग्णांना सेवेचा लाभ मिळतो. राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या आशिर्वादाने रुग्णांना आधार मिळत आहे. या सेवेत आम्हालाही सहभागी होता आले, त्याचे मोठे समाधान मिळत आहे. यापुढील काळातही संधी मिळत राहिल्यास आम्ही आपले योगदान देत राहू.

     याप्रसंगी प्रास्तविक करतांना डॉ.वसंत कटारिया म्हणाले की, या शिबीरासाठी बोथरा परिवाराने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पुणे, मुंबई येथील सुविधा नगरमध्ये अत्यंत अल्पदरात व गुणवत्तापूर्वक रुग्णांना उपलब्ध करुन देण्याचे कार्य सातत्याने हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे. येथे सर्वप्रकारच्या स्पेशालिटी विभाग, तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित स्टाफ अविरतपणे कार्य करुन यशस्वीपणे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करीत आहेत. दर महिन्याला 2000 डायलेसिस व डोळ्यांचे हजारो शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. किडनी विकार, युरोलॉजिस्ट, मुत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया येथे केल्या जात आहेत. यावर्षी किडनी ट्रान्सप्लॅट करण्याचा हॉस्पिटलचा मानस आहे.

     याप्रसंगी युरो सर्जन डॉ.निरज गांधी म्हणाले, शिबीराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना लाभ मिळत आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत व अत्यल्प दरात रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात येतात.

     या शिबीरात  98 रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली. शेवटी जैन सोशल फेडरेशनच्या सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत करुन आभार मानले.

---------



 

Post a Comment

0 Comments