‘इमेल फिमेल’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच
वेब टीम पुणे ,दि. १-सोशल मीडियाचा वापर हे दुधारी शस्त्र झाले आहे. सामाजिक माध्यमांचा उपयोग जसा विधायक आहे तसाच तो विघातकही होऊ शकतो. चॅटिंगमुळे जेव्हा काहीजण फसवणुकीला बळी पडतात तेव्हा सोशल मीडियाची दुसरी काळी बाजू उघडकीस येते. सोशल मीडियाच्या याच फसवणुकीला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय गृहस्थाची कहाणी सांगणारा बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत ‘इमेल फिमेल’ या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच नुकताच सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांच्या हस्तेझाला. २० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटातील तीन गाण्यांना सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुण यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे. करमणूकीसोबत प्रबोधन करणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल असा विश्वास दिग्दर्शक योगेश जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटाला संगीत दिल्याचा आनंद श्रवण राठोड यांनी व्यक्त केला.
निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.
0 Comments