पाणी वाचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा


पाणी वाचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा

पोपट पवार -पद्मश्री मिळाल्याबद्दल भाजपाच्यावतीने सत्कार

   वेब टीम नगर,दि.१ - पूर्वीपासून नगर शहराच्या संपर्कात असल्याने मोठ्या प्रमाणात येथे मित्र मंडळी आहेत. सामाजिक कामांमुळे देशभर नाव झाल्याने अनेकदा राजकीय पक्षांच्या ऑफरही आल्या मात्र त्या न स्वीकारता सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री नितीन गडकरी व स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामीण भागात केलेले काम व हिवरे बाजारचा केलेला विकास या धर्तीवर संसद आदर्श ग्राम योजना सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये माझ्या कार्याचा गौरव केला. केंद्र सरकारने घेतलेल्या कामाच्या दखलीबद्दल आनंद होत आहे. आता ग्रामीण भागात झालेले जलसंवर्धनाचे काम शहरी भागात होणे गरजेचे आहे. नगर शहरात पाणी वाचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी मी स्वत: मार्गदर्शन करेल. किती दिवस हे शहर चाँदबिबीच्या मार्गाने चालेल ; ते आता आपल्या मार्गाने चालेल याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. भारतीय जनता पार्टीने केलेला सत्कार हा आनंद देणारा आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी चांगले मित्र आहेत, असे प्रतिपादन पोपट पवार यांनी केले.
     पोपट पवार यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, याबद्दल शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, श्रीकांत साठे, उपमहापौर मालन ढोणे, वसंत लोढा, पंकज जहागिरदार, वसंत राठोड, सतीश शिंदे, अनिल गट्टाणी, तुषार पोटे, उमेश साठे, सचिन चोरडिया, शिवाजी दहीहंडे, दिलीप भालसिंग, महेश तवले, संजय ढोणे, राहुल कांबळे, मनोज ताठे, गणेश साठे, लक्ष्मीकांत तिवारी, धनंजय जामगांवकर, भरत सुरतवाला, महेश नामदे, अविनाश साखला, दिपक उमाप आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
     प्रास्तविकात महेंद्र गंधे म्हणाले, भारतात नव्हे तर जगात पोपट पवार यांनी नगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. पोपट पवार यांचे कार्य त्यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, असेच आहे. मात्र या आधीच्या सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. केंद्रात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्यांच्या कार्याची उचित दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही सर्व आभारी आहोत. भविष्यातील पाणी नियोजनात पोपट पवार यांनी मार्गदर्शन करावे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.
     याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पोपट पवार यांच्या कार्याचे कौतुक करुन पद्मश्री पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments