बेंगळुरू: 'तीन दिवसांचे मुख्यमंत्री' म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असतानाच कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. 'केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा दावा हेगडे यांनी केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी ही खळबळजनक माहिती दिली. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात आमचा माणूस फक्त ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता, हे सर्वांनाच माहीत आहे. नंतर त्यांनी राजीनामाही दिला. हे सगळं नाटक त्यांनी का केलं? आपल्याकडं बहुमत नाही हे आम्हाला माहीत होतं. तरीही फडणवीस मुख्यमंत्री का झाले, असा प्रश्न सगळे करताहेत. तर त्याचं उत्तर आहे, ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी.'
'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात त्यावेळी केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं सरकार तिथं आल्यास त्या पैशांचा दुरुपयोग केला जाईल. विकासासाठी ती रक्कम वापरली जाणार नाही, हे त्यांना माहीत होतं. त्यासाठीच हे सगळं नाट्य घडवून आणलं गेलं. हा प्लान खूप आधीच ठरला होता. त्यानुसारच फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या १५ तासांत केंद्राचे ४० हजार कोटी परत केले गेले,' असंही हेगडे म्हणाले.
0 Comments