नवी दिल्ली - पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात या वर्षी १ ऑगस्ट रोजी झाली. यात ९ संघांना स्थान देण्यात आले आहे. पाकने नुकतीच ऑस्ट्रेलियात दोन सामन्यांची मालिका खेळली. या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी सर्व संघांनी कमीत कमी एक सामना खेळला आहे. त्यानंतर गुणतालिका पाहिल्यास भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वलस्थानी आहे. कसोटी चॅम्पियनशिपमधील सर्व संघ तीन मालिका घरच्या मैदानावर व तीन मालिका विदेशात खेळतील. आम्ही सर्व ९ संघांचा घरच्या व विदेशातील सामन्यांचा अभ्यास केला. त्याआधारे उर्वरित सामन्यांचे गुण देण्यात आले. त्यानंतर एकूण गुणतालिका पाहिल्यास भारतीय संघ ५०० गुणांपर्यंत पोहोचणारी एकमेव टीम बनू शकते. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील. म्हणजे फायनल या दोघांत खेळवली जाईल. अंतिम लढत जून २०२१ मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड॰सवर होईल. कसोटी क्रमवारीचा विचार केल्यास भारतीय संघ सध्या अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंड दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि आॅस्ट्रेलिया टीम पाचव्या स्थानी आहे. कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्व संघांना ६ मालिका खेळायच्या आहेत. मात्र, सामन्यांची संख्या सारखी नाही. एका मालिकेत कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ५ सामने होतील.
स्मिथ ८१४ धावांवर अव्वल, कमिन्सचे सर्वाधिक ३७ बळी
कसोटी चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक प्रदर्शन पाहता ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८१४ धावांसह अव्वलस्थानी आहे. इतर कोणताही फलंदाज ८०० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. लुबचाने (७००) दुसऱ्या, मयंक अग्रवाल (६७७) तिसऱ्या, अजिंक्य रहाणे (६२४) चौथ्या आणि विराट कोहली (५८९) पाचव्या स्थानी आहे. गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सने सर्वाधिक ३७ बळी घेत अव्वलस्थान राखले.
असे काढले उर्वरित सामन्यांचे गुण :
भारताने गत १० वर्षांत घरच्या मैदानावर ७४ टक्के सामने जिंकले. त्यांना कसोटी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका घरच्या मैदानावर खेळायची आहे. विजयाची टक्केवारी पाहता भारत मालिकेत ४ सामने जिंकू शकतो. १ सामना जिंकल्यावर २४ गुण मिळतात. त्याप्रमाणे ९६ गुण होतात. त्यानंतर भारतीय संघ विदेशात ६ सामने खेळणार आहे. गेल्या १० वर्षांत संघाने बाहेर केवळ ३३ टक्के सामने जिंकले. अशात उर्वरित सहा सामन्यांत २ लढती जिंकू शकतो.
0 Comments