नागपूर : ‘ओबीसींसाठी मंत्रालय भाजपनेच दिले. माझ्यासह अनेक ओबीसी नेत्यांना भाजपनेच मोठे केले. मंत्रिपदांसह अनेक मानाची पदे दिली. त्यामुळे सत्ता जाताच पक्षाने आपल्याला काय दिले हे सगळे विसरून जाणे चांगले नाही,’ असा पलटवार भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपतील नाराज ओबीसींची खदखद जाहीररीत्या व्यक्त केल्यानंतर उठलेल्या वादावर ते बोलत होते.
खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत भाजपतील बहुजन नेत्यांवर अन्याय झाल्याची खदखद गुरुवारी व्यक्त केली होती. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना तिकीट नाकारले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षांतर्गत विरोधकांमुळे झाला, अशी तोफ डागत खडसे यांनी खळबळ माजवली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळेंनी हे आरोप फेटाळून लावले.
मला तर पक्षाने लायकीपेक्षा जास्त दिले
‘केवळ ओबीसी नेत्यांना डावलणे हे एकमेव कारण पक्षाच्या जागा कमी होण्यात नाही. तर पक्षांतर्गत बंडखोरी, पक्षांतर्गत काहींनी जाणीवपूर्वक केलेले पाडापाडीचे प्रकार, अपेक्षित मतविभाजन न होणे आदी कारणांमुळेही पक्षाच्या जागा कमी झाल्या. भाजपने ओबीसींना जेवढे दिले तेवढे एकाही पक्षाने दिले नाही. पक्षाने मला माझ्या लायकीपेक्षा जास्त दिले, असे बावनकुळे म्हणाले.
0 Comments